Labels

Friend (11) mudhoji (11) phaltan (11) reunion (11) school (11)

Wednesday, October 28, 2015

MHS किस्सा - कालची शाळा आजची आठवण

आमचा पहिली ते चौथी हा प्रवास तसा निवांत होता. पण एखाद्याची शाळा घेणं म्हणजे नेमकं काय हे मात्र पाचवीला कळल .तसं बघायला गेलं तर फ़ारसं काही बदललं नव्हतं..पण एक महत्त्वाची गोष्ट मात्र बदलली होती. आजवर सगळ्या विषयांसाठी एकच शिक्षक अशी साधी सोप्पी सवय होती. पण इथे तर प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक होते.
आता तर माझ्यासोबत विषयांचीही काही खैर नव्हती. भाषा, गणित, विज्ञान, इतिहास आणि भुगोल ह्या पांडवामध्ये आता "इंग्रजी" नावाच्या अजुन एका भांवडाची भर पडली होती. "शिकणारा एक और शिकवणारे सहा ... बहुत नाइंसाफ़ी है रे" अश्या असामाईक समीकरणाचा प्रश्न गब्बरला बहुदा सर्वप्रथम पाचवीलाच पडला असणार .. प्रत्येक विषय आता स्वत:चा मोठेपणा पुढे पुढे करु पहात असताना मी मात्र वर्गात एक एक बेंच मागे सरकत होतो ..
बेंचवरुन आठवल .. शाळेत सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीला गॆल्मर असेल तर ते म्हणजे शेवट्च्या बेंचला ..ह्या बेंचची गोष्टच वेगळी होती. तशी वर्गातली पुढची बाके ह्याच्या वाटेला सहसा कधी जात नसत. पुढची बाके अभ्यासात हुशार, तर ही दुनियादारीत. पुढची बाके एक्कलकोंडी, तर ही सदा गर्दीचा सेंटरपोंईट, पुढची बाके टिचररुममध्ये फ़ेमस, तर हा टिचररुमचा चर्चेचा विषय. पुढच्या बाकांवर शिक्षकांचे विषेश लक्ष्य, तर ह्याच्यावर बारीक नजर पुढची बाके आपल्या अक्कल हुशारीने ह्याच्यांकडे जाणूनबुजून जरी दुर्लक्ष्य करत असले तरी त्या बिचार्‍यानां माहित नव्हते की त्यांची हुशारीचे कौतुक ह्यांच्या शर्यतीत भाग न घेण्याच्या आळशीपणावर अवलबूंन होते. पण हे सारे बेंच कसेही असले तरी त्यावेळी ते त्यावर बसणार्याची प्राईव्हेट प्रोर्प्रर्टी होते. बरं ही एव्हढी प्रोर्प्रर्टी त्यावेळी नुसती त्यावर करकटकने आपलं नाव कोरुन आपल्या नावावर करता येत होती.
खरचं किती सोप्प होतं आयुष्य तेव्हा ... जस जस शाळेचे वय वाढु लागलं तसं तसं गणिताची आकडेमोड हातापायांच्या बोटांत मावेनाशी झाली. विज्ञान स्वत:सोबत माझ्यावरही वेगवेगळे प्रयोग करत होता. इतिहासातली सनावळ ही भुतावळीसारखी मानेवर बसली
होती, भुगोल स्व:ताचा देश सोडुन एखाद्या N.R.I सारखा इतर देशांचे गोडवे गाण्यात धन्यता मानु लागला होता. नागरीकशास्त्राने आपल्याला आपल्या आकारमानामुळे कुणीच भाव देत नसल्याचे लक्ष्यात येताच त्यानेही आता अर्थशास्त्राला सोबतीला घेउन आम्हाला जेरीला आणण्याचा जणू विडा उचलला होता.
पण आम्हीही आमच्या कुवतीनुसार ह्या सगळ्या स्वार्‍यानां मोठ्या हिमतीने तोंड देत होतो.
सातवीनंतर शाळा थोडी बिनदास्त बनू लागली. बघता बघता शाळा मॆच्युअर्ड होउ लागली. भाषा, गणित, विज्ञान आणि इतर सारे विषय आता आपले संवगडी वाटु लागले होते. तर परिक्षा एक खोडकर मैत्रीण...
दहावी नावाच्या शेवटच्या वर्षाचा घरच्यांनी दाखवलेला बागुलबुआही आम्हाला कधी घाबरवू शकला नाही कारण शाळेतल्या शिक्षकरुपी देवापुढे त्यांची मजल नाही ह्याची आम्हाला खात्री होती...
सगळं कसं अगदी व्यवस्थीत चालु असताना नेमका तो दिवस आला .... "सॆंड-ऒफ़" इतके दिवस ह्या दिवसाच आकर्षण होते ..... आणि आज तो नेमका उजाडला .. मुली पंजाबी सूट आणि साड्यांमध्ये आल्या होत्या.
इतके दिवस अजिबात लक्ष्यात न आलेली गोष्ट म्हणजे खरंच आजवर आमच्या आजुबाजूला वावरणार्‍या ज्यांना आम्ही साळकाया- म्हाळकाया म्हणून चिडवायचो. त्या आज खंरच मोठ्या झाल्या होत्या.
मुख्याध्यापकांचे भाषण झाले, नंतर शिक्षकांचेही चार शब्द सांगुन झाले, आपण आणि आपली शाळा ह्याच्यावर पुढल्या बाकांचे धडाधड एक दोन निबंधही बोलुन झाले. नंतर एक छोटीशी पार्टी ..
वेळ संपल्याची जाणिव झाली ती मुलींच्या रडण्याने. इतक्यावेळच्या जुही चावला आणि करिष्मा कपूर अचानक आशा काळे व अलका कुबल वाटु लागल्या.
आमची मात्र हसता हसता पुरेवाट झाली. आजचा दिवस भरला आता उद्या आज शाळा सुटली..." अस सांगणारी घंटा नाही ..
लगेच मागे वळुन पाहीलं आणि नेमका शाळेत येतानाचा पहिला दिवस आठवला. गेटवर मी अगदी तसाच उभा होतो रडवेल्या चेहर्याने मागे वळुन पहाणारा फ़क्त आता दिशा बदलली होती.
पहिल्या दिवशी शाळेत येताना आई जशी धुसर होत गेलेली, तशी आज शाळाही हळुहळु डोळ्यात धुसर होत होती.
हे दोन्ही दिवस आजही माझ्यासाठी अगदी तस्सेच होते फ़क्त त्यादिवशी आईने हात सोडला तेव्हा मी तिथे एकटा होतो पण आज जेव्हा शाळेचा हात सुटला तेव्हा माझ्यासोबत माझा आत्मविश्वास होता, डोळ्यात उद्याची स्वप्ने होती , कुठल्याही परिस्थितीत मला सावरणारी संस्काराची शिदोरी होती
आणी मनांत कधीही न पुसल्या जाणाऱ्या  आठवणी होत्या ...
आज ही शाळेच्या गेटवरुन शाळेकडे पहाताना पापण्यांच्या कडा नकळत ओलावतात. तिला पहाताना उर भरुन येतो.......
तर मग जमणार काय गेट-टु ला?